इवो जिमा--नरकातले दुःस्वप्न!
हा फोटो आपण पूर्वीच पाहिलाय. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाला तो व्हाट्सएप्प आणि फेसबुक वर शेअर होत असतो. किंबहुना सर्वच देशांमध्ये असा तो विशिष्ट दिवशी झेंडे बदलून फिरत असतो, तो फोटो आहेही तसाच काळजाला भिडणारा. सहा तरुण एका पर्वताच्या टोकावर आपल्या देशाचा झेंडा रोवत आहेत, ते विजयाचे प्रतीक आहे. पण हा झेंडा कोणाचा आहे? ते सहा तरुण कोण? तो स्टुडिओ मध्ये तरी काढलेला नाही? जेवढा हा फोटो अप्रतिम आहे तेवढाच त्यामागचा इतिहास रोमांचक आहे, जेवढा हा फोटो सुंदर आहे तेवढीच रक्ताची किंमत त्यासाठी मोजलेली आहे.युद्धातले काही क्षण अमर होतात पण युद्ध भयानकच असते. स्टॅलिनग्राड च्या लढाईनंतर युरोपातील युद्धाचे वारे फिरले होते. रशियाने पूर्वेकडून तर नॉर्मंडीत उतरलेल्या दोस्त सेनेने पश्चिमेकडून मुसंडी मारत जर्मनीला जेरीस आणले होते. त्याचवेळी पॅसिफिक मधल्या युद्धात गुडालकॅनाल, ग्वाम, पापुआ न्यू गिनी, फिलिपाइन्स जिंकत अमेरिकन फौजा जपानला मागे सरकवत होत्या. थायलंड, मलेशिया, सिंगापूरही आ...