इवो जिमा--नरकातले दुःस्वप्न!
हा फोटो आपण पूर्वीच पाहिलाय. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाला तो व्हाट्सएप्प आणि फेसबुक वर शेअर होत असतो. किंबहुना सर्वच देशांमध्ये असा तो विशिष्ट दिवशी झेंडे बदलून फिरत असतो, तो फोटो आहेही तसाच काळजाला भिडणारा. सहा तरुण एका पर्वताच्या टोकावर आपल्या देशाचा झेंडा रोवत आहेत, ते विजयाचे प्रतीक आहे. पण हा झेंडा कोणाचा आहे? ते सहा तरुण कोण? तो स्टुडिओ मध्ये तरी काढलेला नाही? जेवढा हा फोटो अप्रतिम आहे तेवढाच त्यामागचा इतिहास रोमांचक आहे, जेवढा हा फोटो सुंदर आहे तेवढीच रक्ताची किंमत त्यासाठी मोजलेली आहे.युद्धातले काही क्षण अमर होतात पण युद्ध भयानकच असते.
स्टॅलिनग्राड च्या लढाईनंतर युरोपातील युद्धाचे वारे फिरले होते. रशियाने पूर्वेकडून तर नॉर्मंडीत उतरलेल्या दोस्त सेनेने पश्चिमेकडून मुसंडी मारत जर्मनीला जेरीस आणले होते. त्याचवेळी पॅसिफिक मधल्या युद्धात गुडालकॅनाल, ग्वाम, पापुआ न्यू गिनी, फिलिपाइन्स जिंकत अमेरिकन फौजा जपानला मागे सरकवत होत्या. थायलंड, मलेशिया, सिंगापूरही आता दोस्त सैन्याने काबीज केले होते. १९४५ साल येता येता दुसऱ्या महायुद्धाचा निकाल स्पष्ट दिसू लागला होता पण हा निकाल आपल्या वंशश्रेष्ठत्वाच्या गर्वाने आंधळ्या झालेल्या जपान आणि जर्मन धुरिणांना दिसत नव्हता. लढण्याच्या जिद्दीने ते पेटले होते आणि युद्ध संपणार तेही आपल्या विजयाने हे माहिती असताना देखील, केव्हा? या प्रश्नाचे उत्तर दोस्त सैन्याकडेही नव्हते.
![]() | |
|
इवो जिमा हे बेट जिंकून त्याचा ताबा घ्यायला अमेरिकन सेनेस ५ दिवस लागतील असा अमेरीकन सेनेस विश्वास होता कारण एक माऊंट सुरीबाची (Mt. Suribachi) सोडल्यास संपूर्ण बेट म्हणजे एक खडकाळ कमी उंचीचा प्रदेश होता. म्हणजे माऊंट सुरीबाची हातात आले म्हणजे पूर्ण बेट ताब्यात आल्यासारखेच. त्यात प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वीच २६ दिवस सलग अमेरिकन विमानांनी बॉंबवर्षाव करून बेट भाजून काढले होते. त्यामुळे बेटावर फारसे कुणीच जिवंत राहिले नसावेत आणि कमीत कमी प्रतिकार करून बेट आपल्या ताब्यात येईल असा समज आणि आशा अमेरिकन सैन्याची होती. १९ फेब्रुवारी १९४५ ला जवळपास ३०००० अमेरिकन सैन्य याच अपेक्षेने बेटावर उतरले पण प्रत्यक्षात त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची त्यांना कल्पना नव्हती.
|
जनरल तदामीची कुरीबायाशी जेव्हा जून १९४४ ला इवो जिमा वर पोचला तेव्हा इवो जिमाच्या बीचवर बंकर खोदून मशिनगन्सच्या पोस्ट बनवण्याचे काम चालू होते. त्याने तसाच चालतच बेटाला एक फेरफटका मारला. त्याने काम थांबवले. एवढ्या छोट्याशा बेटावर बीचपोस्ट उपयोगी ठरणार नाहीत तर त्यासाठी काहीतरी भरीव करावे लागेल हे त्याला जाणवले आणि त्याने जमिनीखालून बोगद्यांचे जाळे विणण्याची आज्ञा दिली. अमेरिकेकडील अत्याधुनिक शास्त्रे आणि संख्याबळ यांच्यापुढे बीचपोस्ट फार काळ टिकणार नाहीत हे त्याला उमजले होते तो युद्धनीतीतील एक कुशल नि चतुर सेनानी होता त्याचबरोबर तो एक लेखक आणि कवीही होता. इवो जिमा बेटावरील परिस्थिती आपल्या हाती घेताच त्याने सामान्य जपानी सैनिक आणि अधिकारी यांच्या दैनंदिन राशन मधली तफावत काढून टाकली. सर्वाना समान अन्न मिळेल याची तजवीज केली.
![]() | |
| जनरल कुरीबायाशी |
१९ फेब्रुवारी १९४५ ला अमेरिकन नौका इवो जिमा च्या किनाऱ्यावर पोचल्या. काही हजार सैनिकांनी सावधपणे बीचवर प्रवेश केला. बीचवर राखेचे पाय रुतून बसण्याइतके ढीग साचले होते त्याशिवाय कोणताच प्रतिकार सुरुवातीला झाला नाही. आणखी काही सैनिक उतरले आणि पुढे निघाले. माऊंट सुरीबाची मध्ये लपलेल्या आपल्या मशीन गन पोस्टना कुरीबायाशीने सबुरीचा सल्ला दिला, जास्तीत जास्त सैनिक बीच वर उतरल्यावरच हल्ला करायचा जेणेकरून जास्तीत जास्त शत्रूसैन्य गारद करता येईल.त्याप्रमाणे सुरु झालेल्या माऱ्यात एका तासात एक हजार अमेरिकन सैन्य टिपले गेले बाकीचे सावध झाले. त्यांना लपायला जागा राहिल्या नाहीत. माऊंट सुरीबाची च्या गुफांमधून होणारे हल्ले परतवता येत नव्हते . कारण जपानी सैन्याच्या हालचालींची ठिकाणे शोधता येण्यासारखी नव्हती आणि बोगद्याच्या मार्गाने त्याना अविरत रसद आणि दारुगोळा पुरवठा होत होता. अमेरिकेने आपला रोख माऊंट सुरीबाची कडे ठेवला होता, कारण सुरीबाची टेकडी इवो जिमा बेटाच्या दक्षिणेला होती आणि तेथून सर्व बेट नजरेच्या टप्प्यात होते. २८ व्या रेजिमेंटच्या हॅरी लिव्हरसिज व त्याच्या इतर सहकार्यांनी बेटाची चिंचोळी पट्टी रात्रीत पार केली व माऊंट सुरीबाची ला इतर बेटापासून अलग पाडले किमान जमिनीवर तरी. सुरीबाची च्या गुफांमधून हल्ले चढवणाऱ्या सैनिकांवर आग फेकणाऱ्या(Flamethrowers) शर्मन टँक्स ने हल्ला चढवला.
![]() | |
|
लढाईच्या पाचव्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारी १९४५ ला २८ व्या रेजिमेंटने माऊंट सुरीबाची सर केले. मायकल स्ट्रँक, हरलॉन ब्लॉक, फ्रँकलिन सौस्ली, रेने गॅग्नन, इरा हायेसआणि हेरॉल्ड शॅल्झ या सहा तरुणांनी आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून अमेरिकेचा झेंडा माऊंट सुरिबाचीच्या टोकावर रोवला. तो क्षण बीचवरील अमेरिकन सैन्य, जहाजांवरील सैन्याने आनंदाने टाळ्या, शिट्या वाजवून आणि आपल्या टोप्या हवेत फेकून साजरा केला. तो एक आनंदाचा, अभिमानाचा आणि त्यागाचा क्षण होता. नेमका तोच झेंडा रोवतानाचा क्षण असोसिएटेड प्रेस च्या जो रोझेन्थाल (Joe Rosenthal) या छायाचित्रकाराने टिपला आणि इतिहासात अमर करून टाकला. याच छायाचित्रासाठी पुढे जो रोझेन्थाल याना पुलित्झर पुरस्कार मिळाला. पुढच्या काही दिवसात जगभरातल्या सर्व महत्वाच्या वृत्तपत्रात तो झळकला. अमेरिकन जनतेत तर राष्टवादाचे वारे संचारले. दुसऱ्या महायुद्धातल्या अमेरिकेच्या लढ्याचे एक प्रतीक म्हणून त्या फोटोकडे पहिले जाऊ लागले.
![]() | |
|
माऊंट सुरीबाची हातात आले म्हणजे संपूर्ण इवो जिमा बेट काबीज झालेच असा सर्वांचाच समज झाला. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर परिस्थिती वेगळी होती. कारण फक्त एक सुरीबाची टेकडी पडली होती अखंड इवो जिमा अजून लढणार होते, हा तर युद्धाचा पाचवा दिवस होता, युद्ध इतक्यात संपणार नव्हते. इवो जिमा जिंकायला अमेरिकेला अजून खूप सैन्याच्या रक्ताचा अभिषेक घालायला लागणार होता. उत्तरेला असलेल्या जपानी सैन्याने बोगद्याच्या माध्यमातून आपल्या हालचाली वाढवल्या. प्रत्येक दिवशी फक्त २००-३०० मी एवढीच चढाई अमेरिकन सेनेला करता येई आणि जमिनीवरून चाल केल्यानंतर त्याखालील सर्व गुफांमध्ये शत्रूसैन्य बसलेले नसल्याची खातरजमा करूनच पुढे जावे लागे. कारण कधीकधी जमिनीवर ताबा घेत अमेरिकन सैन्य पुढे जायचे आणि खालच्या बोगद्यांमधून जपानी सैन्य मागे येऊन अमेरिकन सैनिकांच्या पाठीवर हल्ला करायचे. प्रत्येक दिवसागणिक मृत आणि जखमी अमेरिकन सैनिकांचा आकडा फुगत होता. अमेरिकन सैन्यावर रात्रीतून होणारे हल्ले वाढत होते. अमेरिकन सैनिकांना या गनिमी काव्याचा वैताग आला होता. सरकार अशा युद्धात विषारी वायू वापरून चटकन युद्धाचा निकाल का लावीत नाही असा प्रश्न अमेरिकन सैनिकांना पडला होता. कारण एवढ्या छोट्याशा बेटासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिकांचा बळी देणे त्यांना परवडणार नव्हते.
उत्तरेकडील मोटोयोमा हवाईपट्टी आणि अगदी उत्तर टोकाला असलेल्या ज्या घळईतून कुरीबायाशी आपल्या युद्धाचे सूत्रसंचालन करत होता ती घळई ताब्यात घेणे हे अमेरिकन सेनेचे पुढचे लक्ष्य होते. मोटोयोमाच्या पठारावरील टेकडी नं. ३८२ घेताना जनरल एस्किनने रात्रीचा हल्ला केला. पारंपरिक अमेरिकन हल्ल्यात जसा पायदळाच्या हल्ल्यापूर्वी तोफांचा मारा केला जात असे तसा न करता अचानक पायदळाचा हल्ला करून गाफील राहिलेल्या जपानी सैन्याला त्याने झोपेतच कापून काढले. जपानी सैन्याची प्रचंड वाताहत झाली, कॅप्टन इनोये च्या नेतृत्वाखाली त्यांनी Banzai Attack केला ज्याचा उद्देश फक्त अमेरिकन सैन्याला मागे हटवणे एवढाच नव्हता तर माऊंट सुरीबाची पुन्हा ताब्यात घेणे हाही उद्देश होता. पण अशा हल्ल्याला आता काहीच अर्थ नव्हता १००० सैन्यासह केलेल्या या हल्ल्यात जवळजवळ सर्वजण मारले गेले.
१६ मार्च १९४५ पर्यंत जनरल कुरीबायाशी ज्या घळईत लपला होता ती घळई सोडल्यास संपूर्ण बेट अमेरिकेच्या ताब्यात आले होते. अमेरिकेने ४ टन एवढ्या वजनाची स्फोटके त्या घळईतील कमांड पोस्टवर उडवून दिली. सर्वच बाजूनी घेरल्या गेलेल्या कुरीबायाशी आणि त्याच्या सैन्याजवळ पुरेसे अन्न आणि दारुगोळा उपलब्ध नव्हते. सलग ५ दिवस अन्न आणि पाण्याविना काढल्यानंतर आपल्या ३०० सैन्यासह कुरीबायाशीने २५ मार्चच्या रात्री शेवटचा निकराचा हल्ला केला. जपावी युद्धसंस्कृतीमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांनी अशा निर्वाणीच्या क्षणी प्रत्यक्ष युद्धात न मरता 'सेप्पाकु' (Seppaku) म्हणजे एक विशिष्ट प्रकारची आत्महत्या करण्याची प्रथा होती. ती कुरीबायाशीने मानली नाही. त्याने लढता लढता मरण येणे पत्करले. त्याच्या ३०० सैन्यासह कुरीबायाशीही युद्धात शाहिद झाला. दुसऱ्या दिवशी २६ मार्च १९४५ ला सकाळी ९ वाजता इवो जिमा अधिकृतरीत्या काबीज केल्याची घोषणा अमेरिकेने केली. दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष युद्धात हाती शस्त्र घेऊन शहीद झालेल्या जपानी अधिकाऱ्यांपैकी कुरीबायाशी हा सर्वात मोठा अधिकारी होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जग बदलले जपानही बदलला पण कुरीबायाशी आजही जपानी जनतेचा हिरो आहे.
"Of all our adversaries in the Pacific, Kuribayashi was the most redoubtable.'"-Holland Smith, Commanding General, Iwo Jimaजनरल कुरीबायाशी आणि बेटावरचे सर्वांच्या सर्व २२००० जपानी सैन्य मृत्यमुखी पडले तर अमेरिकन सैन्याला प्रचंड हादरा बसला. जपानच्या एका किरकोळ वाटणाऱ्या बेटावर ताबा घ्यायला त्यांना जवळजवळ सात हजार सैन्याचा बळी द्यावा लागला तर १९ हजार सैन्य जखमी झाले. अजून अखंड जपान तर दूरच होता. तुलनाच करायची म्हटली तर ८ वर्षे चाललेल्या इराक युद्धातही (२००३-११) अमेरिकेने एवढे सैन्य गमावले नाही त्याहून कितीतरी अधिक जीव इवो जिमा वर गमावले. माऊंट सुरीबाची अमेरिकेने पाचव्या दिवशी जिंकले होते पण संपूर्ण इवो जिमा जिंकायला त्यांना अजून ३३ दिवस लागले. इवो जिमा मध्ये लढलेल्या आणि जिवंत परत आलेल्या अमेरिकन सैनिकांच्या मनावर एक इवो जिमा चा ओरखडा उमटलेला आहे. अमेरिकेने जिंकलेल्या आणि एका गाजलेल्या लढाईतले हे हिरो आजही इवो जिमा बद्दल काहीच बोलत नाहीत. आपण जिवंत परत आलो आणि आपले हजारो सहकारी त्या बेटावरून कधीच परत आले नाहीत या गोष्टीची एक अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात कायम आहे. म्हणूनच रॉबर्ट शेरॉड या लढाईचे वर्णन 'नरकातले दुःस्वप्न' (Nightmare in the hell) असे करतो.
माऊंट सुरीबाचीच्या टोकावर झेंडा रोवताना युद्ध संपल्यासारखे वाटत होते पण संपले नव्हते. लाखो अमेरिकन जनतेला आणि सैनिकांना लढायची, जिद्दीनं उभं राहायची प्रेरणा त्या एका क्षणानं दिली. ते छायाचित्र अमर झालं प्रत्येकापर्यंत पोचलं, त्यानं अमेरिकन जनतेच्या अंगावर रोमांच फुलवले. असे फोटो स्टुडिओत काढता येतीलही पण त्यात राष्ट्र उभं करण्याची ताकद नसते तर त्यासाठी प्रचंड त्याग आणि बलिदान द्यावे लागते. झेंडा जरी प्रतीक असलं तरी ती एक जबाबदारीही असते. अमेरिका इवो जिमा मध्ये अडकून पडली नाही, त्यांनी त्यातून योग्य तो धडा घेतला आणि पुढच्या पाच महिन्यात अशक्य असं वाटणारं महायुद्ध त्यांच्या पध्दतीनं संपवलं. मोडेन पण वाकणार नाही असा बाणा असलेले जपान दोन अणुबॉम्बच्या दणक्यात गुडघ्यावर बसले, ९ सप्टेंबर १९४५ ला जपानने शरणागती पत्करली. इवो जिमा घडलं नसतं तरी हे युद्ध अमेरिकाच जिंकली असती पण इवो जिमा हा अमेरिका व जपान दोघांच्याही दृष्टीनं एक महत्वाचा टप्पा होता. १९६८ साली अमेरिकेने इवो जिमा हे बेट जपानला अधिकृतपणे हस्तांतरित करून टाकले. आजही त्या बेटावर दोन्ही देशाच्या वतीनं दरवर्षी २६ मार्चला कार्यक्रम भरवले जातात आणि त्या हजारो वीरांचे स्मरण केले जाते ज्यांनी त्यांच्या देशांना महान बनवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली.
![]() | |
|
--रणजीत यादव
११/११/२०१७






Comments
Post a Comment