गोळवलकर गुरुजी आणि संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही मराठी माणसाच्या स्वाभीमानाची आणि गर्वाची दोन अग्रं आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज की' म्हटलं कि 'जय!' असं ज्याच्या तोंडातून आपोआप बाहेर येतं तो 'मराठी' माणूस. अशी एक सोपी मराठी माणसाची व्याख्या काही वर्षांपूर्वी एका बड्या नेत्याने केली होती जी खरीही आहे. शिवाजी आणि संभाजी महाराज हा महाराष्ट्राच्या मनावर आपोआप होत जाणारा संस्कार आहे. त्यांच्यावर प्रेम करायला कुणाला शिकवायला लागत नाही,ना त्यासाठी इतिहासाची पुस्तकं वाचावी लागतात, आपोआप प्रेम जडत जाते. आणि आज एकविसाव्या शतकातही लाखो करोडो जनतेने त्यांना देवत्वाच्याही वर नेवून ठेवले आहे. 'राजा कसा असावा?' तर तो शिवाजी आणि संभाजी महाराजांसारखा आदर्श असावा हे पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राच्या मनामनावर कोरलेलं असल्याने त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कसलाही किंतु त्यांच्या मनाला कधीच शिवत नाही. मग जेम्स लेन किंवा मल्हार रामरावासारख्या अवलादींनी त्यांच्यावर कितीही डाग पाडायचा प्रयत्न करो, माझे दोन्ही राजे सूर्यासारख्या डोळे दिपवणाऱ्या तेजाने नेहमीच त्यांच्यावर मात करत राहिले.
पण शिवाजी महाराजांशी तुलना करता संभाजी महाराज इतके नशीबवान नव्हते. संभाजी महाराजांचे बलिदान जरी तेजाने उजळून जाणारे असले तरी तेवढ्याच कर्तृत्वाने झळाळणारे त्यांचे जीवन मात्र काही दुष्ट आणि लबाड लोकांनी झाकोळून टाकले. पण शेवटी सत्याचाच विजय होतो त्याप्रमाणे सत्य बाहेर आलेच आणि त्यांच्यावरचे सगळे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. पण काही लोकांनी ते कधीच मान्य केले नाहीत. महाराष्ट्राच्या लाडक्या राजावर असत्याचा आसूड ते ओढत राहिले आणि ते आजपर्यंत तेच करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तिचे एक सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर.
तत्वज्ञान, इतिहास आणि राजकारण अशा सर्व प्रकारच्या विचारांची चर्चा करणाऱ्या गोळवलकरांच्या 'Bunch of Thoughts' या ग्रंथात तसं संभाजी महाराजांना विशेष स्थान नाही पण खंडो बल्लाळ यांच्या राजनिष्ठेचे उदाहरण देताना त्यांचा उल्लेख येतो. गोळवलकर म्हणतात "संभाजी जो दारू आणि स्त्रियांचा व्यसनी होता, त्याने आपली वाईट नजर खंडो बल्लाळ च्या बहिणीवर टाकली होती, त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्यासाठी खंडो बल्लाळ ने तिला आपले जीवन संपवण्याची संमती दिली. आणि संभाजी विषयीची निष्ठा त्यागली नाही". शिवाजी महाराजांच्या आणि जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज स्त्रियांच्या बाबतीत एवढे क्रूर होते काय? सामान्य माणसाच्या बुद्धीला ही गोष्ट कधीच पटली नाही. दारूचे व्यसन संभाजी महाराजांना असल्याचे कोणतेच पुरावे इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करताना मिळाले नाहीत. पण एखाद्या स्त्री ने संभाजी महाराजांपासून स्वतः ला वाचवण्यासाठी आत्महत्या करावी, हा संभाजी महाराजांच्या आयुष्यावर केलेला फार मोठा अन्याय आहे. परस्त्री च्या बाबतीत 'अशीच आमची आई असती!' असं म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांचा छावा एवढा क्रूर असूच शकत नाही कारण हा काही मराठ्यांवर होणारा संस्कार नाही. आणि दुसरे म्हणजे ही गोष्ट धादांत खोटी आहे हे इतिहासाच्या साधनांवरून सिद्ध झालेले आहे.
![]() |
| महाराजांचा अपमान करणारी वाक्ये- Bunch of Thoughts पृष्ठ क्र. ३२३, ३२४ |
[गोळवलकरांचे Bunch of Thoughts हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर rss.org उपलब्ध आहे.त्यासाठीची डायरेक्ट लिंक http://www.archivesofrss.org/ Encyc/2014/1/20/23_07_20_06_ thoughts.pdf आहे. तुम्ही याप्रकारेही पुस्तकापर्यंत पोहचू शकता भेट द्या rss.org >>>Archives>>>Guruji Books>>>Next Page>>>Bunch of Thoughts त्यानंतर PDF मध्ये पृष्ठ क्रमांक ३२३ च्या शेवटी आणि पृष्ठ क्रमांक ३२४ च्या सुरुवातीच्या ओळी पहा.]
***{दि. ०४-०५-२०१८ रोजी RSS च्या संकेतस्थळावरून Bunch of Thoughts हे पुस्तक हटवण्यात आले आहे. तेव्हा पुस्तकाची सॉफ्ट कॉपी खालील पत्त्यावर मिळेल.
https://drive.google.com/file/d/1LUvcTGRVW9HLvHEGR_Ffa4l9HSAPqNVG/view?usp=sharing }
***{दि. ०४-०५-२०१८ रोजी RSS च्या संकेतस्थळावरून Bunch of Thoughts हे पुस्तक हटवण्यात आले आहे. तेव्हा पुस्तकाची सॉफ्ट कॉपी खालील पत्त्यावर मिळेल.
https://drive.google.com/file/d/1LUvcTGRVW9HLvHEGR_Ffa4l9HSAPqNVG/view?usp=sharing }
गोळवलकरांचा इतिहासाचा अभ्यास अर्धवट आणि कच्चा आहे. ते एका ठिकाणी म्हणतात "शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक असलेल्या खंडो बल्लाळ यांचे वडिलांना (बाळाजी आवजी) संभाजी ने सत्ता हाती येताच आपल्या पूर्वग्रहातून देहदंड दिला" आता इथे पूर्वगह सुद्धा संभाजी महाराजांचाच! अहो संभाजी महाराज हे जनतेच्या मनामनात स्थान असलेले आणि नैसर्गिक अधिकाराने पुढचे राजे होते. इथल्या मातीतल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी संभाजी महाराजांच्या नावे टिळा केव्हाच लावला होता. पण पुत्रप्रेमातुन सोयराबाईंनी रचलेल्या कारस्थानात ज्यात संभाजी महाराजांना डावलून आपला पुत्र राजारामाला राजा बनवायचा जो कट काही जणांनी रचला त्यात बाळाजी आवजी सुद्धा होते. आणि त्याच कारणास्तव संभाजी महाराजांनी बाळाजी आवजी याना देहदंड दिला होता, हा खरा इतिहास आहे.
पण असा विक्षिप्त आणि खोटा इतिहास आला कोठून? ज्याला मराठी माणसाने कधीच खरे मानले नाही ते गोळवलकरांना का पटले? त्यांनी ते लोकांना का सांगितले? तर मल्हार रामराव चिटणीस हा बखरकार ज्याने संभाजी महाराजांच्या नंतर १२२ वर्षांनी सूडाच्या भावनेने संभाजी महाराजांचे एक खोटे चरित्र लिहिले. ज्यात खूप साऱ्या भाकडकथा घुसवल्या. संभाजी महाराजांचे दारू आणि स्त्रीयांचे व्यसन ही त्यानेच निर्माण केलेली भाकडकथा! 'खंडो बल्लाळ च्या बहिणीवरची वाईट नजर' ही सुद्धा त्याचीच निर्मिती. प्रत्यक्ष एकही कागद हातात न घेता या माणसाने एक धादांत खोटा संभाजी तयार केला. पण हा कशाचा सूड? तर ज्या बाळजी आवजी याना संभाजी महाराजांनी देहदंड दिला ते बाळाजी आवजी म्हणजे या मल्हार रामरावांचे खापर पणजोबा आणि खंडो बल्लाळ हे पणजोबा. आपल्या खापर पणजोबाना संभाजी महाराजांनी मारलं याचा बदला मल्हार रामरावाने १२२ वर्षांनी संभाजी महाराजांना काळ्या रंगाने इतिहासात रंगवून घेतला. आणि गोळवलकर हाच काळा इतिहास लोकांना सांगत राहिले.
काही संघीय लोक म्हणतात की तेव्हा खरा इतिहास माहिती नव्हता, त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार गोळवलकरांनी संभाजी महाराजांचे चुकीचे वर्णन केले. पण यात काही तथ्य नाही. कारण वा. सी. बेंद्रे या इतिहाकाराने ४० वर्षे प्रचंड मेहनत घेऊन, इतिहासाची अस्सल साधने शोधून काढून संभाजी महाराजांचे खरे चरित्र १९६० साली प्रसिद्ध केले. त्यांनी संभाजी महाराजांच्या चरित्रावरील प्रत्येक डाग पुराव्यानिशी धुवून काढला. 'थोरातांची कमळा', 'तुळसा', अण्णाजी दत्तो यांची मुलगी(?) ''गोदावरी' ही सगळी संभाजी महाराजांच्या जीवनात गोवलेली काल्पनिक पात्रे होती, हे त्यांनी सिद्ध केले. संभाजी महाराज 'रगेल आणि रंगेल' नव्हतेच पण त्याउलट वयाच्या चौदाव्या वर्षी 'बुधभुषणम' सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारे ते महान पंडित होते. हे त्यांनी दाखवून दिले. संभाजी महाराजांच्या नव्या चरित्राने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात भूकंप घडवला होता. इतिहासकार तसेच इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला संभाजी महाराजांचे हे 'खरे रूप' मान्य करावे लागले. पण गोळवलकर गुरुजींनी हे सत्य मान्य केलेले दिसत नाही. शेवटपर्यंत त्यांनी जुने तेच रेटणे चालू ठेवले, अगदी १९७३ पर्यंत, त्यात बदल करायचा कधीच प्रयत्न केला नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतरवेळी लोकांना हिंदुत्व आणि धर्माभिमान शिकवण्यात पुढे असतो. पण गुरुजींनी त्यांच्या हयातीत वा आज २०१८ साली सुद्धा संघाने आपल्या गुरुजींची चूक कधीच मान्य केलेली नाही. आजही संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर झळकणाऱ्या 'Bunch of Thoughts' च्या प्रति मध्ये असणाऱ्या ह्या ओळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर लाथ मारत आहेत आणि आपण ते सहन करत बसलोय. संघाची ही भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे याच मराठ्यांच्या जीवावर हिंदुत्वाची प्रयोगशाळा चालवायची आणि दुसरीकडे त्यांच्यात दैवतावर सतत आघात करायचा. गोळवलकर आज हयात नाहीत पण त्यांच्या 'त्या ओळी' आजही आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही चूक मान्य करून महाराष्ट्राची माफी मागेल काय आणि त्या ओळी काढून टाकेल काय?
-रणजित यादव

This comment has been removed by the author.
ReplyDelete