धर्मस्वच्छता आणि हत्या!
तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असा लहानपणी ऐकलेलं आणि नंतर 'तुकाराम' या चित्रपटात देखील पाहिलेलं. त्यांना पुष्पक विमान येउन घेऊन गेलं! या घटनेच्या सत्यासत्यातेबद्दलशंका होतीच पण विषय श्रद्धेचा असल्याने तसाच सोडून दिला. पण मग अशाच एका दिवशी तुकाराम महाराज अचानक वैकुंठाला गेले, तेही कायमचे, म्हणजेच गायब झाले कसे आणि का? हा प्रश्न होताच. परवाच्या मंगळवारी सकाळी पुण्यात डॉ नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या घालून हत्या झाली क्षणभर सुन्न झालो आणि मग पक्कंच झालं की पाऊणे चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचाही 'दाभोलकर ' च झाला असणार, आणि वैकुंठाला गेले म्हनून आरोळ्या उठवल्या असणार, जो नाही म्हणेल तो अश्रद्ध! मग कोण कशाला नाही म्हणतोय!
भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर सनातनी लोकांची हीच 'स्टाइल' राहिलेली आहे. ज्ञानेश्वर फुले रानडे आंबेडकर यांच्यावरही सनातन्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरून पहिलेच आहेत साम-दाम-दंड-भेद कुठे आणि कुणा विरुद्ध वापरायचे हे त्यांना कृष्णाने पुन्हा पृथ्वीवर येउन सांगितल्याशिवाय समजणार नाही कि कुणास ठाऊक इथे कृष्णाचीही 'हीच' अवस्था होइल. कारण इथे आपला धर्म स्वछ करणे हा गुन्हा मानला जातो मग तो सलमान रश्दि नी केला तर त्यांना 'मुजाहीद्दीनांची' भीती असते आणि दाभोलकरांनी केला तर त्यांना 'सनातन्यांची'.
या सनातनी लोकांचे आत्यंतिक देशप्रेम (chauvinism) हे त्यांचे कवच असते. तलवारी चालवायच्या बॉम्ब फोडायचे गोळ्या घालायच्या आणि 'भारत माता कि जय' अशा घोषणा द्यायच्या आणि जणूकाही देशाखातर बलिदान वगैरे दिल्याच्या 'टोन' मध्ये भाषणे ठोकायची इथेही पुन्हा 'भारत माता कि जय' अशी घोषणा तीन वेळा द्यायची या घोषने नंतर डिस्काउंट मध्ये 'हिंदू धर्म कि जय आणि हिंदू राष्ट्र कि जय' असंही जोडून द्यायचं म्हणजे जमलेल्या गर्दी कडून जय म्हणवून घेता घेता भारत हे हिंदुराष्ट्र आहे यावर शिक्कामोर्तब करून घ्यायचं. अशी गोंधळलेली जनता मग दाभोलकरा सारख्यांचा खून झाल्यावर वातावरण निवळवण्या साठी उपयोगी पडते. यांचा विवेक जागा असतानाही ही जनता मग अशा घटनानंतर चवताळून उठत नाही कारण त्याचं आपण नक्की कुणीकडे आहोत हे ठरलेलं नसतं.
महात्मा गांधींची हत्या केल्यापासून हे लोक हेच करत आले आहेत अगदी आजपर्यंत. जणुकाही देशाची फाळणी झाली म्हणून यांचा जीव कळवळला. जर ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींचा खून फाळणी विरोधी किंवा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिल्याबद्दल झाला तर १९३५ साली पुण्यात हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींच्या गाडीवर बॉम्ब कशाबद्दल फेकले होते? तेव्हा ना पाकिस्तान या शब्दाचा जन्म झाला होता ना भारताची फाळणी! खरे तर पुणे करारानंतर गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलनाची हाती घेतलेली मोहीम म्हणजेच खुन्यांच्या भाषेत हिंदू धर्मातील लुडबुड हे याचे खरे कारण होते. देशाचे भाग्य म्हणून गांधीजी त्या हल्ल्यातून बचावले होते! दाभोलाकारांचा 'दुसरा गांधी' करण्याच्या वल्गना हे लोक उगाच करत नव्हते, कारणही सारखेच होते हे आता लक्षात आलेच असेल.
तालिबान काय आणि सनातन काय फक्त शब्द वेगळे कर्तृत्व तेच! भारतात हिंदू कोड बिल स्त्रियांना देत असलेल्या अधिकारांना आणि हा कायदा मांडणार्या कायदा मंत्री बाबासाहेब आंबेडकरानाही यांनी विरोध केला होता. भारतीय महिलांनीही तोंडावर पदर वगैरे घ्यावा असे यांना मनोमन वाटत असते पण असा एखादा मुद्दा आताच्या स्त्रियांवर लादल्यास आपले दुकानच बंद होऊ शकते याची त्यांना पुरेशी जाणीव असल्याने मग कधी कधी हळूच स्त्रियांनी अंगभर कपडे घालावेत वगैरे सल्ले हे लोक देतात. विशेष म्हणजे या लोकांना तस्लिमा नसरीन किंवा सलमान रशदी सारख्या लोकांच्या बद्दल आदर आणि प्रेम असते कारण ते मुस्लिम धर्म स्वछ करत आहेत. यांना 'वाटर' चित्रपट लिहीणारी दीपा मेहता चालत नाही कारण ती 'सती प्रथेवर' भाष्य करते. यांना घाबरून तडजोड करतात, ते तात्कालिक यश मिळवतात आणि काही तडजोड न करणारे मग 'दाभोलकर' होतत.
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 'जय' ने किंवा भावनिक आवाहन करून देणाऱ्या वृत्तीपासून दूर राहायला हवे. प्रत्येक कालातील जातीप्रथा वर्ण व्यवस्था आणि स्त्रियांच्या बाबतीतील त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचावायला हव्यात. दाभोलकर आता नाहीत पण त्यांनी त्याचं काम केलय आणि त्याच्या मृत्यूबद्दल शोक किंवा राग व्यक्त करून आपण लगेच पुरोगामी होत नाही हे लक्षात ठेवायला हवे. त्यासाठी काहीतरी भरीव करायला हवं प्रथा परंपरांच्या नावाखाली चालनाऱ्या अंधश्रद्धा थांबवण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायला हवं अर्थात स्वतः पासून सुरुवात करून! नाहीतर उपास करता पुण्या घडे म्हणणाऱ्या समाजाला आणखी एखादा दाभोलकर पुरा पडणार नाही
रणजीत यादव,
इचलकरंजी.
Comments
Post a Comment